🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭🏭
क्रांतिअग्रणी कै. जी. डी. बापू लाड हे स्वातंत्र्य लढ्यातील सहभागानंतर शेतकरी कामगारांच्या हक्कासाठी लढले. जी. डी. बापूंनी सहकारी साखर कारखाना काढण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला व अनेक प्रयत्नातून व संघर्षातून अखेर सहकारी साखर कारखान्याला मान्यता मिळाली. सन २००२ च्या हंगामापासून साखर कारखाना सुरू झाला. कारखान्याच्या परिसरातील शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्यामुळे व सिंचनाच्या सोयी पुरेशा नसल्यामुळे सहाजिकच उत्पादन वाढीमध्ये घट होती. म्हणून उत्पादनात वाढ व्हावी व शेतकऱ्याला योग्य ती माहिती मिळावी या उद्देशाने कुंडल मध्ये माती परीक्षण केंद्र व ऊस विकास विस्तार केंद्राची स्थापना केली. संपूर्ण जमीन पाण्याखाली आणण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना आखण्यात आल्या. त्याचबरोबर उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या व परिसरातील मोठ्या प्रमाणातील कोरडवाहू जमिनी पाण्याखाली आल्या.
पुढे जी. डी. बापूंच्या निधनानंतर कारखान्याचे नाव क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना मर्यादित, कुंडल असे करण्यात आले. पुढे कारखान्याच्या धूरा बापूंचे सुपुत्र आमदार अरुण लाड यांनी सांभाळली. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे व आपण त्यांचे केवळ विश्वस्त आहोत या भावनेतून कारखान्याचे काम आजही अखंड आणि निर्विवादपणे चालू आहे. कुंडल परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा कारखाना म्हणून या क्रांतिकारखान्याकडे पाहिलं जातं.
तब्बल ७७ गावातील ऊस शेतकरी हे क्रांतिकारखान्याकडे ऊस देतात. ऊस वेळेत तोडला जावा, वजनात घट व्हायला नको ही शेतकऱ्यांची भावना आजतागायत क्रांतिकारखान्याने जपली आहे. सुरूवातीला कारखान्याची गाळप क्षमता २५०० टन प्रति दीन होती, ती आता ५ हजार टन इतकी आहे. लवकरच ती गाळप क्षमता ७ हजार टन प्रति दीन इतकी होईल. ऊसदराच्या अवाजवी स्पर्धेत न पडता वास्तव दर देण्याची भूमिका या आजच्या घडीला देखील या कारखान्याने कायम ठेवली आहे. २०१९ मधे उच्चांकी ऊसदर ३,३५५ रूपये इतका याच क्रांतिकारखान्याने दिला. शेतकऱ्यांच्या हितासाठी ६० हजार लिटर पाणी क्षमतेचा आसवणी प्रकल्प कारखान्याने उभारला आणि गेली तीन वर्षं झाली तो यशस्वीपणे चालू आहे. त्यामुळे क्रांती म्हणजे योग्य ऊसदर हे गृहितक झाले आहे.
गेल्या दशकापूर्वी राज्यात विजेचा तुटवडा होता. क्रांतीने २० मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभारला. क्रांती कारखान्याने गेल्या दहा वर्षांत १० हजार एकराहून अधिक क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. साखर कारखान्यामार्फत चालू केलेल्या माती परीक्षण केंद्रामध्ये शेतकरी माती घेऊन येऊ लागले. त्याच्या तपासणीसाठी अधिक प्रगत अशी मातीपरीक्षण यंत्रे प्रयोगशाळेत ठेवून, तपासून त्यामध्ये दिसून आलेले नायट्रोजन, कॅल्शियम, फास्फेट यांच्या प्रमाणावरून जमिनींना कोणती खते द्यावीत व किती प्रमाणात द्यावीत याच्या सूचना शेतकऱ्यांना मिळू लागल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. एकरी सरासरी २८ टन उत्पादन क्षमता असलेल्या जमिनीत ४५ टन उत्पादन निघू लागले. प्रत्येकी ४० एकर क्षेत्रासाठी एक ऊस विकास अधिकारी कार्यरत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात १०० ते १२५ टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. ऊस विकास कार्यक्रमावर कारखान्याकडून ८ कोटी रुपये खर्च केले जातात. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना तयार होणाऱ्या प्रेसमडपासून उच्च दर्जाचे व पिकांना उपयुक्त असे जिवाणूयुक्त कंपोस्ट खत तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना दर वर्षी एकरी १० टन याप्रमाणे बिनव्याजी रकमेने शेतकऱ्याच्या जमिनीवर कारखाना पोच करतो. जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढविण्यासाठी जमिनीत तरारून आलेले हिरवे जर्द ताग पीक किंवा ढेंचा हे जमीनीत पुरून त्यापासून जमीनीअंतर्गत खत तयार होवून जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना ३०% हून अधिक तागाचे व ढेंच्याच्या बियांचा पुरवठा करण्याची सोय कारखान्यात उपलब्ध करून दिली आहे. कारखाना परिसरात हवामान प्रयोगशाळाही निर्माण करण्यात आली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची सोय करण्यात आली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह सुरूवातीपासून ठेवला आहे. कारखान्याचे सर्व प्रशासकीय कामकाज डिजीटल पद्धतीने चालू आहे. ऊसतोड झाल्यापासून १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होता. म्हणूनच क्रांती कारखाना म्हणजेच क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना मर्यादित, कुंडल सहकार क्षेत्रात एक आदर्श साखर कारखाना म्हणून दिमाखात उभा आहे .