क्रांती साखर कारखान्याच्या ऊसविकास विभागाच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ” ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी ” या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्या चर्चासत्राचा प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून औषधफवारणीसाठी ड्रोन कसे वापरले जाते याचे प्रात्यक्षिक आ.अरुण अण्णा लाड, मा. प्रतिक जयंतराव पाटील व जि. प. सदस्य शरद लाड यांच्या उपस्थितीत झाले.
शेती क्षेत्रातील आधुनिकता ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी अवलंबून आधुनिक जगातील शेतकऱ्यांसोबत चाललं पाहिजे. ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केल्यावर शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. ड्रोनच्या औषध फवारणीत मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे कीडनाशकांच्या विषारीपणाचे परिणाम शेतकऱ्यांवर होणार नाहीत. शिवाय ड्रोनने फवारणी योग्य आणि समप्रमाणात होऊन उत्पादनात वाढ होईल असे जि. प. सदस्य मा. शरद लाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले.
पूर्वी व सध्याही शेतीसाठी औषधफवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पंपामुळे शेतकऱ्यांना शारिरीक परिश्रम पडते. याऐवजी जर ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केली तर तो त्रास वाचेल. शिवाय ज्या वय झालेल्या शेतकऱ्यांना पंप पाठीवर घेऊन औषध मारणं अवघड जात असेल त्यांना ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करणे फायदेशीर ठरणार आहे. ड्रोन कसा चालतो, कितपत चालतो, त्यासंबंधी माहिती देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू, असे ज्यांनी संकल्पना मांडली ते मा. प्रतिक जयंतराव पाटील यांनी प्रतिपादन केले.
तसेच मजुरांचा प्रश्न, निविष्टांचा खर्च, बदलते हवामान, कमी होणारे पाणी या समस्यांवर डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य आहे़ स्वयंचलित वाहनाद्वारे पीक हताळणी, रोगनिदान व उपाय, काढणी व वाहतूक करणे शक्य होईल़ ड्रोनद्वारे कार्यक्षमरित्या पीक पाहणी व निरीक्षण, जमिनीतील शुष्कता, पिकांवरील रोग व निदान, किटकनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंसर तंत्रज्ञानाद्वारे शक्य होईल़ अशी माहिती मा. प्रतिक जयंतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली.
ड्रोनचा प्रात्यक्षिक कार्यक्रम संपल्यावर मा. प्रतिक जयंतराव पाटील यांनी क्रांती कारखान्याच्या कार्यस्थळावर आदरणीय डॉ. जी. बापूंच्या समाधीचं दर्शन घेतलं. कारखान्याचे अध्यक्ष व पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांनी प्रतिक पाटील यांचा शुभेच्छा सत्कार केला.