कॅप्टन रामभाऊंचा अनुभव शतकपूर्तीकडे ! क्रांती अग्रणी बापूंच्या शब्दाला मान देऊन आपले सर्वस्व त्याग करून प्रतिसरकार चळवळीत सहभागी होणारे कॅप्टन रामभाऊ लाड आज शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत ! थोरांचा आशिर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असला की खूप मोठे बळ मिळाल्या सारखे वाटत असते ! आज भाऊ माझ्या सोबत आहेत ! एक वडीलधारी व्यक्ती माझ्या सोबत असल्याची जाणीव मला नेहमी असते ! भाऊंचे अनुभव खूप मोठे आहेत. त्यांनी एके काळी गाजवलेली मर्दुमकी असो किंवा स्वातंत्र्य चळवळीत असलेला त्यांचा सहभाग , आम्हाला मान ऊंच करायला लावतो ! क्रांतीसिंह नाना पाटील यांनी उभी केलेल्या प्रतिसरकार चळवळीत भाऊ आणि आमच्या कुटुंबातील सर्वजण सामील होते. स्वातंत्र्य चळवळीतील प्रसंग आज पण ते त्यांच्या बोलीभाषेत प्रभावीपणे सांगत असतात ! ते ऐकणे म्हणजे , देशभक्ती आणि देशसेवा काय असते आणि त्यासाठी त्यांनी काय काय केले , हे ऐकून खरंच माझ्या मनात जबाबदारी काय असते याची जाणीव येते. 1990-91 साली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आणि त्यामागील भूमिका यावरील रेकॉर्डिंग करून घेण्यात आणि बापूंना बोलते करण्यात राम भाऊंचे मोठे योगदान आहे. कुंडल ग्राम पंचायत ,कुंडल विविध कार्यकारी सोसायटी ,पाणी पुरवठा संस्थेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. शिक्षण ,शेती , उदयोग , आरोग्य या क्षेत्रात देखील भाऊंचे मोठे योगदान आहे. भाऊ लिहतात सुद्धा बरं का ! ओघवत्या भाषेत त्यांची लिहण्याची पद्धत खूप प्रभावी आहे . कॅप्टन भाऊंनी बापूंवर खुप सारे लिखाण केले. त्यांची भाषा आणि विषय हाताळण्याची पध्दत खूपच प्रभावी आहे. त्यांनी केलेले लिखाण हे अजरामर आहे . हा एक ऐतिहासिक ठेवाच त्यांनी आपल्या लेखणीतून तयार केला ! भाऊ… तुमच्या सारखा मोठा आधार माझ्या सोबत आहे… एवढा मोठा कणा पाठीशी उभा असताना मला कशाची कमी असेल ? ताठ मानेने कसे काम करायचे आणि जनतेसाठी कसे जगायचे हे मी तुमच्याकडून शिकत आलो आहे. तुमचे व्यक्तिमत्त्वच इतके मोठे आहे की , माझे शब्दच अपुरे पडत आहेत ! ” अनुभवांचा मोठा डोंगर सोबत असताना छोट्याशा मातीच्या कणाला कशाची भीती असेल ? ” भाऊ तुम्ही शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहात ! तुम्हाला आणखीन उदंड आणि आरोग्य लाभो !